माळीनगर(युगारंभ )-माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील माळीनगर व लवंग ही दोन्ही गावे राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेत राहिली आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकात या गावांची भूमिका निर्णायक ठरत असते. येत्या 5 नोव्हेंबरला या गावांची ग्रामपंचायत निवडणुक होणार असून, त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
कारखाना केंद्रित निवडणूक-
माळीनगर येथे 17 जागांवर निवडणूक लागली असून यंदा सरपंच पद महिलांसाठी राखीव आहे. माळीनगरचे राजकारण येथील कारखाना व कामगार यांच्यावर अवलंबून आहे. येथे राजेंद्र गिरमे व विराज निंबाळकर यांच्या दोन पॅनल मध्ये ही निवडणूक होताना दिसून येते. गत वेळेस राजेंद्र गिरमे यांच्या गटाने 17 पैकी 14 जागा व 3 जागा विराज निंबाळकर यांच्या गटाने मिळवल्या होत्या. निंबाळकर गटाचा हा ग्रामपंचायत प्रवेश सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. यंदा या जागांमध्ये वाढ करण्यासाठी निंबाळकर गटाने भरपूर ताकद लावली आहे, परंतु कारखान्याचा कामगार हा बहुसंख्य मतदार असल्याने सत्ता स्थापनेचा केंद्रबिंदू कामगार वर्ग असुन हिसुद्धा निवडणूक ‘कारखानशाही‘ होण्याची शक्यता आहे . यंदाच्या निवडणुकीत ग्रामपंचायतची विकास कामे, भ्रष्टाचार, दलित विकास निधी यासह अनेक मुद्द्यावर चर्चा होताना दिसत आहे.
अचंबित युती -नवीन राजकीय समीकरणे
लवंगचे राजकारण हे ठराविक घराण्याभोवती फिरताना दिसते. यामध्ये कोकाटे, वाघ, चव्हाण, भिलारे, दुरापे, मोलाणे घराण्यांचा दबदबा जास्त आहे. प्रत्येक निवडणुकीत वरील घराण्यांची युती व ताटातूट ठरलेली असते. एकूण पाच प्रभागात विखुरलेली ही ग्रामपंचायत प्रत्येक प्रभागात वरील घराणी आपापले वर्चस्व राखून राहिलेली आहेत.
यंदा सरपंच पद खुल्या गटाला असून, त्यासाठी तीन स्वतंत्र पॅनल उभे राहिले आहेत. चव्हाण-कोकाटे-भिलारे आणि वाघ -मोलाणे हे मोहिते पाटील पुरस्कृत दोन पॅनल तर प्रथमच बबनराव शिंदे समर्थक पॅनेलने या निवडणुकीत सहभाग घेतला आहे.
एकूणच तिरंगी लढतीमध्ये विकासकामांपेक्षा ‘घराणे समर्थक मतदार’ यावर निवडणूक रंगतदार ठरताना दिसते आहे.
पारंपारिक शत्रू भिलारे आणि कोकाटे यांची युती तर,चव्हाण समर्थकांनी ऐनवेळी दिलेला त्यांना पाठिंबा यामुळे या पार्टीचे सरपंच पदाचे उमेदवार प्रशांत पाटील यांचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे वाघ व मोलाणे यांनी निवडणूकीपूर्वी उदयाला आलेल्या युवा पर्व या पॅनेलला आपल्यात सामावून ताकद वाढवली आहे व प्रदिप कदम हा तुल्यबळ उमेदवार सरपंच पदासाठी उतरवून निवडणुकीत रंगत वाढवली आहे.
तिसरा पॅनल राहुल टिक यांनी उभा केला असून पूर्ण ताकदीनिशी ग्रामपंचायत लढवण्याचे ठरले आहे. युवकांचे समर्थन व विकास कामे यावर त्यांनी भर दिला असला तरीही सर्व प्रभागात त्यांना उमेदवार मिळू शकले नाहीत.
साहजिकच लवंगची निवडणूक पारंपरिक ‘घराणेशाहीशी‘ एकनिष्ठ होणार हे नक्की.
-
मुद्दा असा आहे की –
युवा पर्व हा पॅनल नेमका सुरू कोणी केला होता व त्याला रसद पुरवुन नेमके काय साध्य करायचे होते, तसेच त्याचे अस्तित्व का संपवले गेले हे मात्र सर्वसामान्यांना न सुटणारे कोडे आहे…….
ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पार्ट्यांनी एकत्र येऊन सरपंच व उमेदवार निवडावे. निवडणुकीतील खर्च गावाच्या विकासासाठी वापरावा या सामाजिक संघटनेतील युवा कार्यकर्त्यांच्या मागणीचा विसर मात्र पॅनलच्या सर्व प्रमुखांना पडलेला दिसत आहे…..
एकूणच खर्च कितीबी होऊ दे पण आता माघार नाही या हेतूने प्रेरित झालेले नेते विकासाच्या मुद्द्यासाठी यश अपयशानंतरही मागे हटणार नाहीत हीच ‘लोकशाही ‘अपेक्षा.